कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापुरात ऊस दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली आहे. ‘एफआरपी’ चे तुकडे करण्याचा कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. तर २३ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या उस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र अद्याप ही ऊस दरासंदर्भात कोणताही तोडगा निघालेला नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात सुरू असणारी ऊस वाहतूक ठीक ठिकाणी बंद पाडली आहे. या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात संघर्षाची ठिणगी पडू नये आणि या हंगामातील ऊस दराबाबत तोडगा निघावा यासाठी आज कोल्हापुराच्या शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कारखानदार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला कारखानदारांच्या वतीने आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे हे उपस्थित होते. तर शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील , जिल्हाध्यक्ष सावकर मादनाईक यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळपास तासभर बंद दाराआड सुरू असणारी चर्चा सुरू होती.
परंतु ‘एफआरपी’चे तुकडे करण्यावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते बैठकीतून बाहेर पडले. उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे साखर कारखाने बंद राहतील. जर साखर कारखाने सुरू झाले तर शेतकरी संघटनेमार्फत उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तर तेवीस तारखेला होणाऱ्या ऊस परिषदेत ठरणारा अंतिम ऊसदराचा निर्णय होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.