नागपूर : हॅलो महाराष्ट्र – मध्य प्रदेशातील शिवनी येथून एक महिला कामाच्या शोधात कोराडी या ठिकाणी आली होती. या ठिकाणी काही नराधम आरोपींनी तिचा गैरफायदा घेतला. सर्वात पहिल्यांदा या महिलेच्या नातेवाईकाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पतीच्या मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे ती महिला परत शिवनीला गेली. त्या ठिकाणी जाऊन या महिलेने शिवनी पोलिसांत तक्रार दाखल केली. परंतु, प्रकरण कोराडीचे असल्यानं ते प्रकरण कोराडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.
नातेवाईकानेच केला घात
शिवनी जिल्ह्यातील एका गावातील महिला आपल्या पतीसोबत कामासाठी कळमेश्वरला आली होती. 2 डिसेंबर 2021 ला त्यांनी बांधकाम मजूर म्हणून काम केले. यानंतर तिची एका झोपडपट्टीत नातेवाईकाकडे राहण्याची व्यवस्था करण्यात आली. या महिलेचा पती वर्धा येथे काम करत होता. 6 डिसेंबर 2021 रोजी कृष्णा देहरिया याने संबंधित महिलेवर अत्याचार केला. यानंतर या महिलेने आपल्या पतीला हि सर्व घटना सांगितली. मात्र तिच्या पतीने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर ठेकेदाराला ही बाब कळल्यानंतर त्याने तिला 16 डिसेंबर 2021 रोजी कोराडी येथे पाठविले.
पतीच्या मित्रांनीच केला अत्याचार
यानंतर हि महिला तायवाडे झोपडपट्टी परिसरात राहू लागली. यादरम्यान तिच्या पतीने मित्रांसोबत दारू घेतली. पतीने बाहेरून झोपडीचे दार लावले. त्यावेळी त्याचा मित्र प्रदीप व त्याची पत्नी आतमध्ये होते. यानंतर प्रदीप बाहेर आल्यानंतर अजय नावाच्या दुसऱ्या मित्राने तिच्यावर अत्याचार केला तर बाहेर पती पाहारा देत होता. यानंतर पीडित महिलेने कशीबशी स्वतःची सुटका करून माहेर गाठले आणि आपल्या बहिणीला घडलेली सगळी घटना सांगितली. यानंतर बहिणीच्या मदतीने शिवनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अजय, प्रदीप, कृष्णा डेहारिया व तिच्या पतीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत.