दुखःद : यात्रेत सासनकाठी नाचवताना तरुणाचा विजेचा शाॅक लागल्याने जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे गावाच्या यात्रेत एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. पालखी दरम्यान सासनकाठीला 11 केव्ही क्षमतेच्या वीज वाहिनीचा शॉक लागून काठीचा मानकरी असलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. महेश बाळासो माने असे मृत युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज मंगळवारी दि. 19 रोजी भोसे गावात ग्रामदैवत ज्योतिर्लिंग यात्रेत देवाची पालखी व मानाची सासनकाठीची ग्रामप्रदक्षिणा होती. सासनकाठीचे मानकरी महेश बाळासो माने हा होता. त्यांनी ही काठी आकर्षकरित्या सजवून त्यावर वीजेच्या माळादेखील लावल्या होत्या. सकाळी ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात झाली. त्यावेळी महावितरण कंपनीच्या 11 केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीचा काठीला धक्का बसला. वीजप्रवाह काठीत उतरला आणि महेश माने यांचा जागीत मृत्यू झाला.

ग्रामस्थांनी महेशला तातडीने कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. माने कुटुंबातील महेश हा एकुलता एक मुलगा होता. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांचेही दोन वर्षापूर्वी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. महेश अविवाहीत होता. त्यांच्या निधनाने यात्रेचा सगळा उत्साहच मावळला. सगळ्या गावाला या दुर्घटनेने मोठा धक्का बसला आहे