कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने तळ गाठला आहे. १०५ टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या शिवसागर जलाशयात काही प्रमाणातच काही काही ठिकाणी पाणी साठा शिल्लक असल्याचे पहावयास मिळत आहे मात्र ते पाणी बोट चालतील इतपत नसल्याने बोटी सुक्या नदीपात्रात उभ्या आहेत.
यावर्षीच्या खडक उन्हाने सर्वत्र पाण्यासाठी भटकंती होत असताना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत गेल्याने सद्यस्थितीत पाण्याने तळ गाठला आहे.बामणोली तापोळा परिसरात सुरू असणारा बोट व्यवसाय पाण्याअभावी ठप्प झाला आहे. बामनोली सह तापोळा परिसरातील सातशे ते आठशे बोट चालकांवर बोट व्यवसाय ठप्प झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. जलाशयाची पाणीपातळी खालावल्याने बोट चालकांना आपल्या बोटी कोरड्या नदीपात्रात उभ्या करून आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. खरोशी रेनोशी पर्यंत पसरलेल्या पाण्याची पाणी पातळी अगदी तापोळ्याच्या देखील खाली आली आहे.
काही दिवसांपूर्वी तापोळा या ठिकाणी मयत झाले होते तर बामणोली सह संपूर्ण भागातून लोकांना मयतीसाठी जाण्यासाठी दोन दोन ते तीन तासाचा पायी प्रवास करावा लागला. बामणोली ते तापोळा बोट चालतील एवढे देखील पाणी शिल्लक नाही. कांदाटी खोऱ्यातील सोळा गावांचा पूर्णपणे संपूर्ण तुटला असून, पाण्याची पातळी शेंबडी नजीकच्या त्रिवेणी संगमापर्यंत आली आहे.
शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने तापोळा भागातील गाढवली, अहिर ,अहिरे वानवली, वाळणे ,आवळण, खरोशी रेनोशी या गावांसह गोगवे ,वेंगळे ,रामेघर, वारसोळी गावांचा तर बामणोली भागातील वाकी, फुरुस , हातरेवाडी, निपाणी, आपटी, केळघर तर्फ सोळशी, तेटली, कळकोशी, कारगाव, आंबवडे या गावाचा तर कांदाटी खोऱ्यातील दरे तर्फ तांब, पिंपरी तर्फ तांब, आकल्पे, निवळी, लामज, वाघावळे, उचाट, मोरणी, म्हाळुंगे, आरव, सिंधी, वलवण या गावांचा एकमेकांशी असणारा संबंध पूर्णपणे तुटला आहे. जर का या गावातील एखाद्या पै पाहुण्याकडे जायचं म्हटलं तर मैलोन मैल पायी प्रवास करत जावे लागते. जर का एखाद्या गावात एखाद्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अतिप्रसंग आलाच तर बामणोली किंवा तापोळा या ठिकाणी दवाखान्यात आणेपर्यत त्या व्यक्तीला जीवदान मिळेलच अस नाही.
अशी परिस्थिती पाणी आटल्याने निर्माण झाली आहे. या भागातील लोकांचे दळणवळणाचे मुख्य साधन हे बोट असल्याने पाणीच नसल्याने बोटी चालणार तरी कशा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसागराने तळ गाठल्याने बोट व्यवसायावर अवलंबून असणाऱ्याचे कुटुंब उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. जी कोयनामाई भरल्यावर संपूर्ण परिसर कसा हिरवागार करून सोडते तीच कोयनामाई आज उघडी पडली आहे.
त्या दोन पुलांची निर्मिती कधी?
शिवसागर जलाशयाच्या पाण्यावर तापोळा बाजारपेठे नजीक आहिर ते तापोळा असा पूल मंजूर झाला असून, त्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर देखील होऊन त्याची निविदा देखील काढली असल्याचे बोलले जाते मात्र अध्याप कामाला सुरुवात झाली नाही.
तसेच तापोळा ते आपटी बौद्ध वस्ती या पुलाच्या सर्वे करीता देखील १५ लाख रुपये मंजूर असून अद्याप सर्वेला देखील मुहूर्त सापडला नाही. हे दोन्ही पूल झाल्यास संपूर्ण भागाचा बऱ्यापैकी दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.