कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात रयत आणि संस्थापक पॅनेलना एकत्रित आणण्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर काॅंग्रेस तसेच उंडाळकर गट जाणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर खोडशी येथील कोयना दूध संघावर ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण उपस्थित मोजक्याच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत धक्कादायक निर्णय घेण्याची मागणी अनेकांनी केल्याने सावध पाऊले उचलली जावू लागली आहेत.
कोयना दूध संघात सायंकाळी झालेल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डाॅ. इंद्रजित मोहिते कि माजी चेअरमन अविनाश मोहिते यांना पाठिंबा द्यायचा यावर नेत्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. या बैठकीत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्यात एकमत दिसून आले नाही, प्रत्येकांनी वेगवेगळी मते मांडली. यावेळी काहींनी एकत्रिकरण किंवा स्वतंत्र लढणार आहेत, हे आधी दोन्ही पॅनेल प्रमुखांनी जाहीर केल्यानंतर आपली भूमिका जाहीर करू असेही सांगितले. परंतु कारखान्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलच्या विरोधात सूर दिसून आला. तर एकत्रिकरणांची भूमिका ताठर होत असल्याने या बैठकीतील पदाधिकाऱ्यांनी अविनाश मोहिते आणि इंद्रजित मोहिते या नेत्यांच्यावरही आगपाखड करण्यात आली.
कृष्णा कारखान्यात डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाची चर्चा थांबविल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी काल जाहीर केले. त्या निमित्ताने त्यांनी ‘कृष्ण’चे सभासद ठरवतील, असेही जाहीर केले. त्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर ऍड. उदयसिंह पाटील व मनोहर शिंदे यांनी बैठकीतील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. कदाचित, उदयसिंह पाटील आणि मनोहर शिंदे हे पुन्हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते यांची भेट घेवून बैठकीतील निर्णयांची चर्चा करतील. त्यानंतरही एकत्रिकरण झाले नाही तर कार्यकर्त्यांनी धक्कादायक निर्णय घेण्याची मागणी केली, असल्याचे समजत आहे.