कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीच्या आघाडीच्या विषयावर झाल्याचे समजत आहे. पवार- चव्हाण भेटीने पुन्हा आघाडीच्या वावड्या सुरू झाल्या आहेत.
सातारा व सांगली जिल्ह्यांतील कराड, वाळवा, कडेपूर, पलूस, खानापूर, शिराळा या तालुक्यात सभासद असणार्या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल आणि अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल एकत्र यावे, यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, अॅड. उदयसिंह पाटील सातत्याने बैठका घेवून चर्चा घडवून आणत होते. दोन्ही विरोधी पॅनेलने एकत्र येत कारखान्याचे विद्यमान चेअरमन डाॅ. सुरेश भोसले, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले समर्थक सहकार पॅनेलविरुद्ध महाआघाडीचा प्रयोग व्हावा, यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र आठ दिवसापूर्वी झालेल्या रात्रीच्या बैठकीत पर्याय न निघाल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रक्रियेतून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले होते.
खासदार शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे सिल्वर ओकवर गेले होते. प्रकृतीची विचारपूसर करण्यासोबतच या भेटीत कृष्णा कारखान्यांच्या निवडणुकीचा विषयावरही चर्चा झाली आहे. मात्र अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही, त्यामुळे आघाडीचा वावड्या पुन्हा सुरू झाल्या असून दुरंगी की तिरंगी हे लढती विषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.