कृष्णा नदीला पूर : अवकाळी पावसाचा कहर पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पुलावर पाणी आले आहे. पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुलावर आलेले पाणी पाहण्यासाठी परिसरातून लोक गर्दी करू लागले आहेत. तसेच जिहे कठापूर – कोरेगाव या मार्गावर पुलावर पाणी आल्याने वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

जिहे- कठापूर ते कोरेगाव या मार्गावर असलेल्या कृष्णा नदीला पूर आला आहे. अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिहे- कठापूचा पूल पाण्याखाली गेला आहे. रात्री झालेल्या जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्याने ऊस, हरभरा, ज्वारी, व आले यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस तोड कामगारांच्या राहणाऱ्या झोपड्यामध्ये पाणी गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. दरम्यान सातारा तालुक्यातील शेवटचे गाव जिहे येथील कृष्णा नदीच्या पुलावरून पाणी गेले त्यामुळे कटापूर तसेच कोरेगावला जाण्याचा मार्ग पूर्णतः बंद झालेला आहे

You might also like