आश्विन अमावास्येतील लक्ष्मीपूजन : काय आहे यामागील आख्यायिका?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लक्ष्मीपूजन आश्विन अमावास्येला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी केले जाते. हा दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो. लक्ष्मी ही फार चंचल असते असं म्हणतात. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरात श्रीसूक्त पाठही केले जाते. व्यापारी लोक आपल्या हिशोबाचे पुस्तक पूजतात. त्यांच्या नवीन वर्षाची सुरूवात लक्ष्मी पूजनापासून सुरू होते. त्यासाठी पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तांदूळ ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया दागिने ठेवून त्यांची पूजा केली जाते.

हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. तसेच दुकानाची सजावटही करून लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन या दिवशी केली जाते. घरातील संपत्ती, लॉकर सर्व खुले केले जातात. आधीच्या काळात रात्री कुबेर पूजन करण्याची प्रथा होती. कुबेर हा खजिनदार आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजन हा मूळ संस्कृतिक कार्यक्रम होता.

याच दिवशी लोक, स्वच्छता करण्यासाठी लागणारे नवीन झाडू विकत घेऊन, तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे. आपल्याला पैसा कमविण्याची कला साध्य असते. पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर शिकवतो. म्हणून व्यापारी लोक या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेराची पूजा करतात. लक्ष्मीला घरात पसारा, अस्वच्छता आवडत नाही. जिथे टापटीप असते, तिथे तिला राहायला आवडते. केवळ टापटीपपणा म्हणजे सुंदरता असे नाही. तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, मनात कपटभाव नसतो किंवा मोह विकार व अवगुण नसतात, जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो, ती व्यक्ती, लक्ष्मी व कुबेराला प्रिय असते
लक्ष्मीपूजनाला ऐतिहासिक परंपरा आहे.

गुप्तकाळात वैष्णवांना राजाश्रय मिळाल्याने आधीच्या कुबेरा बरोबरच नंतर लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशान काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याच्या पत्नीसह दाखवला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्याच्या पत्नीची सुद्धा पूजा केली जात होती. कालांतराने कुबेरपत्नीच्या जागी लक्ष्मी व कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले असावे. अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते. तिला जेष्ठा, षष्टी व सटवी, निऋत्ती या नावाने ओळखतात. निऋत्ती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून मान्यता नाकारली, तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख ‘दुर्गासप्तशती’ मध्ये आहे.

इतिहास काहीही असो वर्तमान काळात, सर्वच लोक लक्ष्मीपूजन हे मोठ्या आनंदात व उत्साहाने करतात. लक्ष्मीपूजन करण्यामागे, घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व आरोग्य सतत नांदत राहो व अज्ञानाचा नाश होवो हीच भावना असते. जी सर्वांनाच हवीहवीशी असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजारामध्ये मातीची लक्ष्मीची मूर्ती मिळते. ती विकत आणून तसेच पाच मडके सुद्धा पूजनासाठी आणले जातात. त्या छोट्या मडक्‍यांमध्ये लाह्या व बत्ताशाचा प्रसाद आणि वर एक रुपया ठेवतात. असे पाच मडके भरून देवीसमोर ठेवतात. पूजेसाठी श्रीयंत्र गजलक्ष्मी किंवा नारळ-सुपारी खोबरं यांचा विडा असतो. तसेच पैसे आणि पूजेसाठी हळदीकुंकू, अक्षदा, कापूर अगरबत्ती आणि दिवा महत्त्वाचा असतो.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेला फोटोची सुद्धा पूजा केली जाते. आश्‍विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात त्यांच्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते असा समज आहे.

लेखक – प्रतीक पुरी