व्वा रे महसूल विभाग ! भूमिहीन शेतकऱ्याला आले अतिवृष्टीचे अनुदान 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एकीकडे ज्यांना शेती आहे ज्यांचे अतिवृष्टी मुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. तोच दुसरीकडे मात्र, एका भूमीहीन व्यक्तीस अतिवृष्टीची 825 रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचा प्रकार अजिंठा येथे उघडकीस आला. त्या भूमिहीन व्यक्तीने मिळालेली रक्कम शासन खात्यावर जमा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकारामुळे महसूल विभागाचा गलथान कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील अजिंठा येथील मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांच्या कडे शेती नाही फक्त त्यांच्याकडे एक राहते घर आहे. त्यांना जमीन नाही इतकेच नव्हे तर त्यांच्या परिवारात वडिलोपार्जित कोणतीही जमीन सुद्धा नाही. तरी ही अजिंठा येथील एसबीआय शाखेतील त्यांच्या खात्यात 26 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचे 825 रुपये नुकसान भरपाई जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला आहे. बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

यानंतर मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांनी सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे यांच्याकडे तक्रार केली आहे. जमा झालेले अनुदान सरकारी खात्यावर जमा करून करावे, तसेच भूमिहीन असताना अनुदान कसे मिळाले याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment