सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्यात बंडखोर आमदार आणि शिवसैनिक आमनेसामने आलेले आहेत. यामध्ये बंडखोर आमदारांचे कार्यालय फोडण्याचे तसेच निषेध मोर्चा ठिकठिकाणी काढण्यात आले. मात्र, बंडखोर आमदारांना तसेच कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनासाठी समर्थकांनी आज कोरेगावात रॅलीसाठी मोठी गर्दी केली.
एकच वादा महेश दादा, महेश शिंदे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.., आमदार महेश शिंदेसाहेबांचा विजय असो, अशी घोषणाबाजी समर्थकांनी केली. या मेळाव्यास मोठ्यासंख्येने जनसागर लोटला होता. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ३० आमदारांसह बंड पुकारले आहे. हे सर्व आमदार सध्या गुहाटीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे स्थानिक शिवसैनिक एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे सांगत एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. तर बंडखोर आमदारांच्या समर्थकांनीही आपल्या नेत्यांच्या बाजूने आपली ताकद असल्याचे दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
एकनाथ शिंदेंच्या बंडात सातारा जिल्ह्यातील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा समावेश आहे. आज कोरेगावात आमदार महेश शिंदेंच्या समर्थकांनी पाठींबा दर्शवण्यासाठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. तसेच महेश शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी मेळाव्याच्या माध्यमातून आमदार महेश शिंदेंनी कोरेगाव मतदारसंघात केलेल्या कामांची व कोरोना काळात केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच सर्व समर्थकांनी आमदार महेश शिंदेंच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला.