विशेष प्रतिनिधी | लोकांशी थेट संबंध येणारे आणि प्रतिष्ठेचे गृह खाते विदर्भाला देण्याचे योजून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठा गेम खेळला आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृह खाते देण्यात येईल असे मानले जात होते. अधिकृत खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. पण खास गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गृह खाते विदर्भातील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना देण्याचा निर्णय पवारांनी घेतला आहे. अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन खाते देण्याचे ठरले आहे. एकाच बाणात अनेक शिकारी करण्याचा थोरल्या पवारांचा हा प्रयत्न आहे. पुतण्याचे पंख कापण्याचे हे ऑपरेशन आहे.
अजितदादा हे स्वयंभू आणि स्वयंघोषित नेतृत्व आहे. काहीही पत्ता नसताना अजितदादांनी बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. दादांची ही बुलेट ट्रेन रोखणे सोपे नाही. सरकार टिकवायचे असेल तर अजितदादांना ‘शांत, समाधानी’ ठेवणे जरुरी असल्याचे भान थोरल्या पवारांना आहे. पुतण्याने भाजपसोबत सरकार बनवण्याचा प्रयत्न केल्याच्या दिवसापासून थोरले पवार आपल्या पुतण्याबाबत ताकही फुंकून पित आहेत.
सरकारमध्ये पुतण्याचे प्रस्थ फ़ार वाढू नये म्हणून ह्या काकाने काही स्पीडब्रेकर्स टाकले आहेत. गृह खाते पश्चिम महाराष्ट्राबाहेर देऊन पुतण्याला मर्यादेत ठेवण्याची ही योजना आहे. अनिलबाबू देशमुख हे शरद पवारांचे विदर्भातील अतिशय विश्वासू सहकारी आहेत. विदर्भात राष्ट्रवादीची फार ताकद नाही. विदर्भात महत्वाचे खाते देऊन राष्ट्रवादीची ताकद वाढवायची असा मेसेज थोरले पवार देऊ पाहत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातले आहेत. देवेंद्र यांच्याच जिल्ह्यात आपल्या नेत्याला मोठे खाते देऊन भाजपला रोखण्याचाही हा डाव आहे.
काका-पुतण्यातच नव्हे तर तिन्ही पक्ष आणि त्यांच्या नेत्यांमध्ये शहकाटशह सुरु झाले आहेत. विस्तारात मंत्र्यांची यादी कुणी फायनल केली यावरून वादळ उठले आहे. तिन्ही पक्षांमध्ये डावललेले आमदार आपापल्या हायकमांडकडे धाव घेत आहेत. अशोक चव्हाण यांना घेतल्यामुळे पृथ्वीराजबाबा दुखावले आहेत. पृथ्वीराजबाबांची सोनियाजींशी जवळीक पाहता काँग्रेसची यादी बदलू शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेतही धुसफूस सुरु झाली आहे. अवघ्या २९ वर्षे वयाच्या आदित्य यांना जास्तीचे महत्व मिळाल्याने नाराजी आहे. पण इतक्यात कुणी बोलायला तयार नाही.