शरद पवारांमुळे अजित पवारांना महत्व, त्यांची छत्रछाया नसती तर त्यांना कोणी विचारले नसते

Sharad Pawar and ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे-फडणवीस भाजप सरकारमध्ये सामील झाल्यापासून त्यांच्यावर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आणि विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता उपराकार माजी आमदार लक्ष्मण माने (Lakshman Mane) यांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना, “अजित पवार हे पांढर्‍या शुभ्र चकचकीत बगळ्यांचे नेते आहेत. शरद पवारांमुळे अजित पवारांना महत्त्व आहे, शरद पवारांची छत्रछाया नसती तर अजित पवारांना कोणी विचारलेही नसते” असे लक्ष्मण माने यांनी म्हटले आहे.

बुधवारी पुण्यामध्ये लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर जोरदार टीका केली. तसेच, “बारामतीला तीनवेळा मुख्यमंत्रिपद मिळाले. पण, विकास आणि मोठे काम झाले नाही. मीच बारामतीचा विकास केला.” या अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. पुढे बोलताना, “पूर्वी बारामतीचे विद्यार्थी शिक्षणासाठी फलटणला जात होते. आता देशातील विद्यार्थी शिक्षणासाठी बारामतीला येतात. विद्या प्रतिष्ठान अजित पवारांनी नाही तर शरद पवारांनी सुरू केले. आप्पासाहेब पवार आणि शरद पवारांनी अजित पवार राजकारणात नव्हते तेव्हा बारामतीचा विकास केला.” असे लक्ष्मण माने म्हणाले.

इतकेच नव्हे तर, “शरद पवार तीनवेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी बारामतीसह राज्यातील नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी काम केले. समाजाचा आर्थिक स्तर सुधारला आहे की नाही, हे पाहण्यासाठी शरद पवार व्यापार्‍यांची बैठक घ्यायचे. अजित पवारांनी तळागाळातील समाजासाठी एकतरी कार्यक्रम घेतला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना, “मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. हे आम्ही नाकारत नाही. परंतु, त्यांना आमच्या ताटातील भाकरी न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे. मनोज जरांगे यांच्या पाठीमागे भाजप व आरएसएसची शक्ती आहे. जरांगे मनुवादी आहेत” अशी भूमिका लक्ष्मण माने यांनी मांडली.