कोल्हापूर प्रतिनिधी | महापूराने हरवलेलं कोल्हापूरचं वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करुया, शासन, समाज आणि गणेशोत्सव मंडळानीही याकामी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी भरीव कार्य करुया, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने येथील केशवराव भोसले नाटयगृहात आयोजित केलेल्या गणराया ॲवॉर्ड वितरण सोहळयाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. समारंभास श्रीमंत शाहु महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदाच्या भीषण महापूराच्या काळात शासन, प्रशासनाबरोबरच संपूर्ण कोल्हापूरकरांनी तसेच विविध सेवाभावी, स्वयंसेवी संस्थासोबत विविध गणेश मंडळानी पूरग्रस्तांसाठी बचाव आणि मदत कार्यात फार मोठे योगदान दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, महापूराच्या काळात सर्वांच्या सक्रीय योगदानामुळे जीवीतहानी टाळता आली, तसेच सर्वच पूरग्रस्तांना वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणे शक्य झाले, हेही तितकेच महत्वाचे आहे. यापुढे पूरग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी शासन कटिबध्द आहेच, मात्र शासनाबरोबरच संपूर्ण कोल्हापूरकरांनी पूरग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेच आहे. याकामी गणेशोत्सव मंडळानीही सक्रीय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.