मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) वार्षिक सर्वसाधारण सभेत आज महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ही कंपनीची 43 एजीएम होती. विविध व्हर्च्यूअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिलायन्सचे जवळपास एक लाखहून अधिक शेअर होल्डर या बैठकीत सामील झाले होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलच्या सहभागाविषयीही माहिती दिली. जिओ प्लॅटफॉर्मवर गुगल 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे भारताला 2G मुक्त करु, असेही अंबानी यावेळी म्हणाले.
जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती यावेळी अंबानी यांनी दिली आहे. या गुंतवणूकीद्वारे गुगल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 7.7 टक्क्यांची हिस्सेदारी घेईल. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये लॉकडाउनदरम्यान गेल्या ३ महिन्यांत झालेल्या एकूण गुंतवणूकीचा आकडा 1 लाख 52 हजार 056 कोटी रुपये होईल.
या कराराविषयी अधिक माहिती देतानामुकेश अंबानी म्हणाले, “गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे भारताला 2G मुक्त करु. याशिवाय भारत 5 जी युगाच्या दारात उभा आहे. सध्या 2 जी फोन वापरणार्या 35 कोटी भारतीयांना स्वस्त स्मार्टफोन देण्याचा प्रयत्न आहे.” तर, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनीही ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकापर्यंत इंटरनेट पोहोचायला हवं, जिओसोबत भागीदारी केल्यामुळे जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचता येईल याचा आनंद वाटतोय” अशी प्रतिक्रिया पिचाई यांनी दिली आहे.
Everyone should have access to the internet. Proud to partner with @reliancejio to increase access for the hundreds of millions in India who don’t own a smartphone with our 1st investment of $4.5B from the #GoogleForIndia Digitization Fund.https://t.co/1fP8iBZQfm
— Sundar Pichai (@sundarpichai) July 15, 2020
जिओ येत्या तीन वर्षांत अर्धा अब्ज मोबाईल ग्राहकांशी जोडला जाणार आहे. जिओने संपूर्ण 5 जी तंत्रज्ञान विकसित केली आहे. 5 जी स्पेक्ट्रम लवकरच उपलब्ध होणार आहे, त्याच्या चाचण्याही सुरू होतील, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान पुढील वर्षी फिल्डवर वापरण्यासाठी तयार केले जाऊ शकते. आम्ही भारतात जागतिक स्तरीय 5 जी सेवा आणणार आहोत. आम्ही जागतिक स्तरावर टेलिकॉम ऑपरेटर्सना 5 जी सोल्यूशन देऊ. जिओचा 5 जी सोल्यूशन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनसाठी समर्पित आहे असं मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.