हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यांनतर आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Governor)म्हणून नियुक्ती झाली आहे. रमेश बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल असतील. केंद्रात मंत्रिपद भूषवलेले रमेश बैस तब्बल सात वेळा छत्तीसगड येथून खासदार झाले आहेत. आजपर्यंत एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता म्हणून ते ओळखले जातात.
रमेश बैस हे मूळचे छत्तीसगड येथील आहेत. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला. 1978 मध्ये ते सर्वप्रथम रायपूर महानगरपालिकेत निवडून आले होते. इथूनच त्यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. याशिवाय, सलग 7 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. रमेश बैस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधे केंद्रात पर्यावरण आणि वन राज्यमंत्रीपद सुद्धा भूषवलं आहे. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करणारी विधाने केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी टीकेचे धनी बनले होते. राज्यपालांचा राजीनामा घ्या अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येत होती. छत्रपतींचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी सुद्धा कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतला होती. त्यातच राज्यपालांनी स्वतःच मला पदमुक्त करावं अशी मागणी केल्यांनतर अखेर केंद्राने त्यांचा राजीनामा मंजूर केला.