हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ज्या नेत्याची सर्वाधिक चर्चा झाली ते म्हणजे आक्रमक भाजप नेते नारायण राणे. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. शिवसेनेला आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेटपणे अंगावर घेणाऱ्या नेत्यांमध्ये राणेंचं स्थान हे कायम अग्रस्थानी राहिले आहे. शिवसेनेतून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा करणारे नारायण राणे यांनी नंतर काँग्रेस, स्वाभीमान पक्ष आणि आता भाजप असे अनेक पक्ष बदलले असले तरी राज्याच्या राजकारणातील त्यांचं महत्त्व जराही कमी नाही झालं.
चेंबूर येथील शाखाप्रमुख या पदापासून नंतर मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री अशी गगनभरारी राणे यांनी घेतली आहे. नारायण तातू राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी कोकणात झाला. सुरुवातीला चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे 1985 साली मुंबई महानगरापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले
२००३ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केल्यानंतर राणे नाराज झाले आणि त्यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये दाखवलं झाले. एकेकाळचे कट्टर शिवसैनिक असलेले नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका करण्यास सुरुवात केली. बाळासाहेबांबद्दल त्यांनी कायम आदर राखला पण उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना ते कुठेही कमी पडले नाहीत. उद्धव ठाकरेंवर त्यांनी अनेकदा खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे
काँग्रेस मध्ये गेल्यानंतर देखील राणे म्हणावे तसे खुश नव्हते. काँग्रेसने त्यांना महसूल खात दिल्यानंतरहि ते अस्वस्थ होते . त्यांची नजर हि कायमचं मुख्यमंत्रीपदावर होती जे त्यांना काँग्रेस कडून कधीही देण्यात आलं नाही. अखेर त्यांनी सोनिया गांधी , अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचावर टीका करत काँग्रेसलाही रामराम ठोकला
देशातील एकूण राजकारणाचा विचार करून राणेंनी भाजप मध्ये उडी मारली आणि त्यांच्या टीकेची धार आणखीच वाढली. आत्ताही राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं असताना राणे मात्र राज्यातील प्रत्येक घटनेवरून सरकारवर सडकून टीका करत असतात. नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांकडून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका केली जाते . मध्यंतरी झालेल्या स्थानिक स्वराज्य असंस्थेच्या निवडणुकीत राणेंनी दमदार कामगिरी केल्यानंतर भाजप नेतृत्वाच्या मनात राणे बसले आणि त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं