लघु पाटबंधारे प्रकल्पाची पाणीपट्टी न भरल्यास सातबाऱ्यावर बोजा आकारणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
कोयना, वांग, उत्तारमांड, उत्तरवांग नदीवरील लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील सर्व लाभधारक शेतकरी ग्राहक ज्यांना सिंचनासाठी जलसंपदा विभागाकडून पाणीपुरवठा केला जातो. यामधील शेतकरी ग्राहक यांची पाणीपट्टी थकबाकी रक्कम 10 हजार पेक्षा जास्त आहे. अशा शेतकऱ्याच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्यात येणार आहे.

लघु पाटबंधारे प्रकल्पात लाभधारक शेतकरी ग्राहक यांच्यावर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतुदीनुसार जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आकारणीचा बोजा चढविण्याची कार्यवाही महसूल व जलसंपदा विभागाकडून प्रास्तावित करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित लाभधारक शेतकरी ग्राहक यांनी शासनाच्या महसूलामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने पाणीपट्टी थकबाकी रक्कम तात्काळ भरुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

लघु पाटबंधारे विभागाच्या लाभ क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांची पाणीपट्टी थकीत आहे. सध्या ऊस कारखान्यांना घातला जात असल्याने पाटबंधारे विभागाने ही वसुली सुरू केली आहे. त्यामुळे पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले असून जे भरणार नाहीत, त्याच्या सातबाऱ्यावर बोजा आकारणी केली जाणार आहे.