औरंगाबाद – शहरात काल रविवारी एकापाठोपाठ एक चार जणांनी आपली जीवन यात्रा संपवली. त्यातील दोघांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन तर दोघांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. एकीकडे लग्न चार दिवसांवर ठेवलेले असताना नवरी मुलगीच निघून गेल्याने धक्का बसलेल्या वडिलांनी टोकाचा मार्ग पत्करला, तर दुसरीकडे प्रेयसी सोबत वादानंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरीच गळफास घेतला. या चार आत्महत्यांच्या घटनांमुळे औरंगाबाद शहर काल हादरले होते.
पहिल्या घटनेत मुलीचे लग्न चार दिवसांवर आले असताना नवरी मुलगी घरातून निघून गेल्याने खचलेल्या पित्याने मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री संग्रामनगर उड्डाणपुलाच्या परिसरात घडली. संजय खंडुजी वाकेकर (45) असे या पित्याचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास अंमलदार सुदाम दाभाडे करत आहेत. दुसऱ्या घटनेत शिवाजीनगर येथील रेल्वे रुळावर एकाने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. शुभम शेषराव काळे (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास अंमलदार के.के. साबळे करत आहेत.
तिसऱ्या घटनेत शहरातील न्याय नगर मध्ये शनिवारी सायंकाळी प्रियकर आणि प्रेयसीच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. अमोलराजे भाऊसाहेब चव्हाण (32) असे मृताचे नाव असून अमोलच्या नातेवाईकांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाणे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यानंतर सहाय्यक निरीक्षक एस. के. खटाणे यांनी समजूत काढली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. तर चौथ्या घटनेत एका कंपनीतील कामगारांचे आत्महत्याची केल्याची घटना घडली आहे. कुलदीप मुरलीधर गवांदे (19) असे मृत युवकाचे नाव आहे. तो वाळूजमधील एका कंपनीत कामावर होता. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास अंमलदार ए.एन. जाधव करत आहेत.