कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील वाठार येथे आज महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत देशी- विदेशी दारू, वाईन शाॅप आणि बियर बार दुकान यांना परवानगी देण्यावर चर्चा करण्यात आली. महिलांनी हातवर करत एकमुखाने परवाना नामंजूर केला. उद्या (दि. 17) रोजी पुरूषांची ग्रामसभा होणार आहे.
वाठार ग्रामपंचायतीने आजच्या सभेत 10 विषयाची सभा आयोजित केली होती. त्यामध्ये 2 नंबरचा विषय गावात हा देशी- विदेशी दारू दुकान (वाईन शाॅप) आणि बिअर बारला परवाना देण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच शोभाताई पाटील, उपसरपंच बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मोरे, रंजना माने, स्वप्निल कानडे, अभिजीत पाटील, ग्रामसेवक रियाज मोमीन, क्लार्क अनिकेत माने उपस्थित होते.
ग्रामसेवक रियाज मोमीन यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. यावेळी ते म्हणाले, गावात दारू व बिअर बार परवान्यासाठी दोन अर्ज आले आहेत. आबासाहेब भिमराव पाटील (रा. वाठार) यांना स्वः मालकीच्या जागेत बिअर बार व दारू दुकान सुरू करण्यासाठी ना हरकत दाखल मिळावा, असा अर्ज आला आहे. यावर महिलांचे काय मत आहे, असे ग्रामसेवकांनी विचारताच महिलांनी एकमुखाने हात वर करत विरोध केला.