Wednesday, June 7, 2023

आता शेअर्स तारण ठेवून घेता येणार कर्ज, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । काहीवेळा अशी काही परिस्थिती येते ज्यावेळी आपल्याला तातडीने पैशांची गरज भासते. यासाठी अनेक प्रकारे पैशांची व्यवस्था करता येऊ शकते. जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर आता आपत्कालीन परिस्थितीत शेअर्स तारण ठेवूनही कर्ज घेता येऊ शकेल. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला ऑनलाइन कर्ज मिळेल. तुमच्या सोयीनुसार शेअर्स तारण ठेवून मिळालेले कर्ज तुम्ही वापरू शकाल.

ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसची एनबीएफसी आर्म जिओजित क्रेडिट्सने बुधवारी शेअर्स (LAS) वर कर्ज देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला. जिओजित नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (NSDL) कोणत्याही डिमॅट खातेधारकाला शेअर्सवर डिजिटल पद्धतीने कर्ज देणारी पहिलीच कंपनी ठरली आहे.

moneycontrol.com च्या मते, कोचीमधील NSDL च्या MD, पद्मजा चंद्रू यांनी सांगितले की,”गुंतवणूकदारांना त्वरित लिक्विडिटी देण्यासाठी ही डिजिटल LAS सुविधा तयार करण्यात आली आहे. त्याचा उद्देश गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी फंडस् देणे किंवा तत्काळ वैयक्तिक खर्च पूर्ण करण्यात मदत करणे हा आहे.”

कर्ज कोण घेऊ शकतो ?
जिओजित ग्रुपचे संस्थापक आणि एमडी सी.जे. जॉर्ज यांनी या सुविधेच्या लॉन्च समारंभात सांगितले की,”जे ग्राहक LAS डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे शेअर्स गहाण ठेवून कर्जासाठी अर्ज करू इच्छितात त्यांच्याकडे त्यांच्या डिमॅट खात्यांमध्ये पात्र असलेल्या शेअर्सची फ्री होल्डिंग असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांचा CIBIL स्कोअर समाधानकारक असावा. NSDL मध्ये डिमॅट खाते असलेले सर्वजण या सुविधेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात. यासाठी ब्रोकर कोण आहे याने काहीच फरक पडत नाही.

ऑनलाइन कर्ज मिळवा
सी.जे. जॉर्ज म्हणाले की,”तुम्ही तुमच्या आवडीची योजना निवडू शकाल आणि सर्व कागदपत्रे ऑनलाइन करू शकाल.” ते म्हणाले की,”कर्जाच्या अर्जावर डिजिटल सिग्नेचर झाल्यानंतर आणि मंजूर झाल्यानंतर, रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि वापरलेल्या रकमेवर व्याज आकारले जाईल.”