कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करुनही लिहून घेतलेली शेतजमीन परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली. या मानसिक धक्क्यातून पती उदय जयसिंगराव पाटील (वय २८, रा. मुडशिंगी, ता. हातकणंगले) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावकार संजय श्रीकांत शिंगाडे (रा. मुडशिंगी, ता. हातकणंगले) याच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाटील यांची पत्नी माधवी उदय पाटील यांनी बुधवारी निवेदनाव्दारे केली. दरम्यान, या प्रकरणी संशयित सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधीक्षक देशमुख यांनी हातकणंगले पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना दिले.
पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘पती उदय पाटील यांनी सावकार शिंगाडे याच्याकडून तीन वर्षापूर्वी दहा टक्के व्याज दराने दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची वेळेवर परतफेडही केली. मात्र काही व्याज आणि मुद्दल शिल्लक असल्याच्या भूलथापा मारुन जबरदस्तीने लिहून घेतलेली शेतजमीन संजय शिवाजी अनुसे (रा. मुडशिंगी, ता. हातकणंगले) याला विक्री केली.
ही माहिती पाटील यांना १० फेब्रुवारी रोजी समजली. त्यांनी सावकाराची भेट घेवून उर्वरित रक्कमेची व्यवस्था करतो. मला दोन लहान मुले आहेत, तुम्ही शेतजमीन कोणालाही विक्री करु नका, अशी विनंती केली. मात्र ही विनंती धुडकावून सावकाराने परस्पर जमीन विक्री केल्याची माहिती कळताच मानसिक धक्क्याने पाटील यांचा मृत्यू झाला आहे.’ या मागणीचे निवेदन त्यांनी सहकार उपनिबंधक कार्यालयालाही दिले आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.