एटापल्ली प्रतिनिधी । मनोहर बोरकर
एटापल्ली तालुक्यातील सुरजागडसह दमकोंडावाही, बेसेवाडा, वाळवी, मोहंदी, गुडजुर, नागलमेटा, व पुस्के अशा पहाडीवरून लोहखनिज उत्खनन केले जात आहे. उत्खननास तीव्र विरोध दर्शवून, मूलभूत सोयीसुविधाच्या मागणीसाठी स्थानिक आदिवासींनी गेल्या तीन आठवड्यांपासून ठिय्या आंदोलन पुकारलेले आहे. सदरच्या आंदोलनाच्या समर्थनात गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीगड राज्याच्या आदिवासी व पारंपरिक निवासी भागातील नागरिक हिरीहीरीने सहभाग नोंदवत आहेत.
सुरजागड इलाका पारंपरिक गोटूल समिती व दमकोंडावाही बचाव संघर्ष समिती अध्यक्ष रमेश कवडो, इलाका प्रमुख सैनू गोटा, सचिव लक्ष्मण नवडी, मंगेश नरोटे, प्रदीप हेडो, सैनू हिचामी, शीला गोटा, मंगेश हेडो, सुशील नरोटी, सुशील तिग्गा, सविता कौशी व सुनीता कवडो यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आले आहे. या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून सुरजागडसह विविध पहाडीवरील लोहखनिज उत्खनन बंद करणे, गट्टा ते तोडगट्टा आंतरराज्य मार्गाचा रस्ता निर्माण करण्यात येऊ नये, पोलीस कॅम्प उभारण्यात येऊ नये, रुग्णालय, शाळा, महाविद्यालयाची निर्मिती करणे, डॉक्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावे, आदिवासी क्षेत्रात भौतिक व मूलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनाच्या समर्थानात स्थानिक भाकपा वगळता, इतर कोणत्याही जबाबदार पुढारी, राजकीय पक्ष, संघटनांनी पाठींबा दर्शविला नाही. मात्र. 70 ते 80 गावांच्या ग्रामसभा व हजारो आदिवासी नागरिकांकडून पदरचे अन्नधान्य आणून खुल्या आकाशात चुली पेटवून पोटाची खळगी भरून सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठिय्या दिला जात आहे.
सदरच्या आंदोलन मंचावरून दिवसभर विविध भागातून आलेले आंदोलक महिला, पुरुष, युवक व युवती, आदिवासींच्या संविधानात्मक हक्क अधिकारांवर मार्गदर्शन, चर्चा व विचारमंथन करत आहेत. आंदोलनाची दखल घेऊन आदिवासींचे जीवनमानात बाधा निर्माण करण्याच्या लोहखनिज खाणींची लीज रद्द करण्यात येऊन आदिवासींच्या रूढी, परंपरा, जल, जंगल, व जमिनीचे रक्षण करण्याची तीव्र मागणी शासन दरबारी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.