लॉकडाऊन कधीपर्यंत कायम ठेवायचा हे तुमच्या हाती, फक्त..- मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत देशातील इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावा अशी सूचना पंतप्रधान मोदींना केली होती.त्यानुसार राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी त्यांनी लॉकडाऊन कायम ठेवण्याची घोषणा केली. तसंच लॉकडाउनचा कालावधी कधीपर्यंत वाढवायचा हे तुमच्या हाती आहे असं म्हणत सर्वांनी शिस्त पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ”१४ एप्रिलनंतर किती काळ लॉकडाउन ठेवायचा हे आपल्या हातात आहे. आपण शिस्त पाळली तर करोनाच्या साखळीतून लवकर बाहेर पडू. १४ एप्रिल नंतर आपण काय करणार याच्या सूचना लवकरच देण्यात येतील. राज्यात काय सुरू राहिले, कोणते उद्योगधंदे सुरू राहतील याची माहितीही १४ तारखेपूर्वी देण्यात येईल,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन राहील हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी किमान या शब्दावर विशेष भर दिला. भाजी-मंडई किंवा अन्य कुठेही तुम्ही गर्दी केली नाही तरच ३० एप्रिलनंतर लॉकडाउनमधून बाहेर पडता येईल असे त्यांनी सांगितले. किमान शब्द वापरताना त्यांनी नागरिकांना शिस्त पाळण्याचं आवाहन केलं. करोनाबाधितांची संख्या वाढत राहिली तर कदाचित ३० एप्रिलनंतरही लॉकडाउन कायम राहू शकतो. यादरम्यान काही ठिकाणंची बंधनं शिथिल करता येतील का यावर विचार केला जाईल. तर काही ठिकाणची बंधनं ही या कालावधीत अधिक कठोर करण्यात येतील. लोकांनी शिस्त पाळली पाहिजे. हे संकट धर्म, जात पाहून येत नाही, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”