अमरावती । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी मुंबई झालेल्या पत्रकारपरिषदेत यवतमाळसह अकोला, अमरावती, जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा दिला होता. त्यानुसार वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालाय. दर रविवारी जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात रविवारी लॉकडाऊनची घोषणा झालीय.
अमरावती जिल्ह्यात दर आठवड्यात शनिवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. उद्या 19 फेब्रुवारीपासून शहर आणि जिल्ह्यातील सर्व आस्थापना, हॉटेल्स दररोज रात्री 8 वाजता बंद होणार आहेत. जलतरण तलाव, इनडोअर गेम पूर्णपणे बंद राहणार आहेत. धार्मिक समारंभाला केवळ 5 व्यक्तींचीच परवानगी असणार आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यास आणखी कठोर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय. विदर्भात अकोल्यात 74, अमरावतीत 82, अमरावती मनपा क्षेत्रात 310, यवतमाळमध्ये 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. अकोला परिमंडळातच एकूण 662 रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही जिल्ह्याती मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन अॅलर्ट झालं आहे.
दरम्यान, आज गुरुवारी सकाळी मुंबई झालेल्या पत्रकारपरिषदेत अजित पवारांनी यवतमाळ, अकोला, अमरावती, जिल्ह्यात लॉकडाऊनचा शक्यता वर्तवली होती. कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर तिथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मी त्यांच्या कानावर घातले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले होते. अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये लॉकडाऊन करण्याचे स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आलेले असून, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना हे निर्देश देण्यात आले असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं होतं.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.