पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच पुणे महापालिकेची कोरोना संबंधी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सूचक विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी पुण्यातल्या निर्बंधाविषयीदेखील भाष्य केले.
मागील पाच सहा दिवसांत पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढली आहे, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची नेमकी काय तयारी आहे याचा आढावा आम्ही घेतला असे मोहोळ यांनी सांगितले. तसेच, महापालिकेनं व्यवस्थित तयारी केली आहे. बेडची व्यवस्था, ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था पुरेशी आहे. चिंतेचं कारण नाही, असं त्यांनी सांगितलं.
‘पुणे शहरात नव्यानं सापडणारे रुग्ण नेमके कुठल्या प्रकारातील आहेत. त्यातील पहिल्यांदा बाधित झालेले किती आहेत? त्यातील पहिला डोस झालेले आणि दुसरा डोस झालेले किती आहेत? याचीही माहिती घेतली. लहान मुलांसाठी महापालिकेनं विशेष रुग्णालयं सुरू केली आहेत. हडपसर, वारजे आणि बाणेर इथं नवी रुग्णालयं सुरू होत आहेत. त्यामुळं नव्यानं काही निर्बंध लावण्यापेक्षा सध्या असलेले निर्बंध काटेकोरपणे पाळले जातील हे पाहायला हवं. अर्थात, त्याबाबतचा निर्णय उद्या होईल, असं मोहोळ म्हणाले.
अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत लोकांची मागणी, त्यांचा आग्रह, शाळा, उद्याने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सगळ्यावर सारासार चर्चा होईल. जिल्ह्याच्या टास्क फोर्सचे अधिकारीही बैठकीला उपस्थित असतील. शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय देखील उद्या होईल. लोकांचं म्हणणं काय आहे हेच मी उद्याच्या बैठकीत मांडणार आहे, असंही मोहोळ यांनी सांगितलं.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले कि, निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेणार आहे. तसेच क्वॉरंटाईनसाठी पुन्हा हॉटेल सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितल आहे. याव्यतिरिक्त पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीने पोहोचणे महत्त्वाचे आहे त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत.
पुण्यात 80 टक्के लोकं कोरोनाबाधित
पुण्यात एकूण 80 टक्के लोक कोरोनाबाधित झाले आहेत. महत्वाचे म्हणजे या लोकांनी आपले दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या दरम्यान या दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये कोरोनाने नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. यापैकी 80 टक्के लोकांनी आपला दुसरा डोस पूर्ण केल्याचे आढळून आल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितले. तसेच या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.