कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर
करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने धस्तावलेल्या एका जोडप्याने बाइकवरून गावची वाट धरली असता शाहूवाडी येथे त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात या जोडप्यासहीत त्यांचा लहान मुलगाही ठार झाला असून या दुर्देवी घटनेमुळे शाहूवाडीतील जांबूर या त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्जेराव भीमराव पाटील (वय ३३), पूनम सर्जेराव पाटील (वय २७) आणि त्यांचा मुलगा अभय सर्जेराव पाटील (वय ६) हे सर्वजण डोंबिवलीवरून गावी जांबूर येथे मंगळवारी जायला निघाले होते. जायला कोणतंही वाहन नसल्याने त्यांनी दुचाकीवरून गावी जाण्याचा निर्णय घेतला. ट्रिपल सीट निघालेल्या या जोडप्याने कराडपर्यंतच अंतरही पार केलं होतं. मात्र, कराडवरून चार-पाच किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर शेडगेववाडीच्या दिशेने जात असताना त्यांचं भरधाव बाइकवरील नियंत्रण सुटलं आणि बाइक रस्त्याच्याकडेवरून घसरली. त्यामुळे त्यामुळे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांन तात्काळ कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
परंतु, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच लहानग्या अभयचा मृत्यू झाला होता. तर सर्जेराव आणि त्यांची पत्नी पूनम हे दोघेही बेशुद्धावस्थेत होते. बुधवारी उपचार सुरू असताना सर्जेराव यांचा मृत्यू झाला तर पूनम यांची मृत्यूशी झुंज सुरूच होती. दवाखान्यात ३० तासांहून अधिक काळ मृत्यूशी झुंज देणाऱ्या पूनम यांची शुक्रवारी प्राणज्योत मालवली.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.