मुंबई । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर अपघातात मरण पावलेल्या मजुरांमुळे व्यथित झालो असल्याचे सांगितले.
ते म्हणाले कि, ”आज आपल्याशी बोलताना मी काहीसा व्यथित आहे. औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी मनातून दुःखी झालो आहे. जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघाले आहेत आपण त्यांना आजही सांगतो आहे की राज्य सरकार तुमच्यासोबत आहे असा विश्वास त्यांनी राज्यातील परप्रांतीय कामगारांना दिला.
ते पुढे म्हणाले कि, ”इतर राज्यातल्या सुमारे ६ लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत. इतर राज्यातही ट्रेन सुरु करुन केंद्र सरकार, आपलं राज्य आणि ज्या राज्यात त्या मजुरांना जायचं तिथल्या सरकारसोबत बोलणी करुन मजुरांना पाठवण्यात येतं आहे. या सगळ्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला त्रस्त होण्याचं कारण नाही. तुम्ही थोडासा संयम बाळगा आम्ही तुमच्यासोबत आहोत” असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. घरी जाण्यासाठी मजुरांनी गर्दी करु नये, संयम राखावा अन्यथा सर्व ठप्प होईल. अस्वस्थ होऊ नका असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी मजूर कामगारांना केले.
अफवेला बळी पडू नका. मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशी एक अफवा पसरली आहे. लष्कर कशाला पाहिजे? आत्तापर्यंत जे काही केलं ते तुम्हाला सांगून करणार आणि तसंच करणार आहे. त्यामुळे मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार नाही. महाराष्ट्रातले सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत. कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे हे विसरु नका” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”