मुंबई । राज्यातील कोप्रादुर्भाव वाढतच असून तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार असल्याने ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल गुरुवारी राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना राज्यातील करोना परिस्थितीची माहिती दिली. तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनाही ऐकून घेतल्या. या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यातील लॉकडाऊन १७ मेनंतर वाढवून तो ३१ मेपर्यंत ठेवण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमधील सर्व लोकांची तपासणी करण्यात यावी आणि करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवून रस्त्यावर फिरणाऱ्यांना अटकाव करावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचं सूतोवाच केल्याचं बोललं जातंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच ३१ मेपर्यंत राज्यातील सर्व जिल्हे ग्रीन झोनमध्ये आणण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, असं सांगण्यात येतं. दरम्यान, आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्री ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे ते काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”