मुंबई प्रतिनिधी | मुसद्दी राजकारणी म्हणून संपूर्ण विदर्भाला परिचित असणारे नाना पटोले हे नितीन गडकरींना पराभूत करतील या चर्चेला नागपुरात उधाण आले आहे. कधीच पराभवाचे तोंड न बघितलेल्या नाना पटोलेंच्या मागे मोठा जनसमुदाय आहे. तर त्यांनी नितीन गडकरी यांना तगडी लढत दिली असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे भाजपला नितीन गडकरींच्या निकालाची चिंता वाटते आहे अशी माहिती सूत्रांनी दिली दिली आहे.
नितीन गडकरींचा विकास पुरुष म्हणून गवगवा होत असला तरी त्यांनी नागपूरच्या लोकांच्या सर्वच अपेक्षा पूर्ण केल्या असे म्हणता येणार नाही. विलास मुत्तेमवार यांचा पराभव करून लोकसभेत गेलेल्या नितीन गडकरींनी २०१४ साली प्रथमच काँग्रेसच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला आणि संघभूमी नागपूरमध्ये भाजपचा भगवा फडकवला. मात्र पाच वर्षात परिस्थिती खूप बदली आणि मोदी लाट देखील ओसरून गेली. त्यामुळे काँग्रेससाठी नागपूर शहरात परिस्थिती अनुकूल होती. त्याच परिस्थितीचा फायदा नाना पटोले यांनी उठवला. मोदी सरकारच्या धोरणावर टीका करून नानांनी मोठी मते घेतली आणि लोकसभेकडील आपला मार्ग प्रशस्त केला.
अशा परिस्थितीत नाना पटोले यांनी नितीन गडकरींचा पराभव केल्यास गडकरींचे दिल्लीमधील वजन कमी होऊ शकते. तर नाना पटोले यांचे देखील काँग्रेस मधील वजन वाढू शकते. मात्र नागपूरचा निकाल काय लागणार या प्रश्नाचे उत्तर आता अवघ्या काही तासातच मिळणार आहे.