अमरावती । खासदार नवनित राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरातही कोरोनानं शिरकाव केला आहे. रवी राणा यांच्या कुटुंबातील १० जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये त्यांचा मुलं आणि सासू सासऱ्यांचाही समावेश आहे.
रवी राणा यांचे वडिल गंगाधर राणा यांचा रविवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कार्यकर्ते यांच्यासह ५० ते ६० जणांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. रवी राणा यांच्याआई- वडिलांसोबतच मुलगा-मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण १० जणांचे चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आमदार रवी राणा यांची मुलगी ७ वर्षांची असून मुलगा ४ वर्षांचा आहे.
दरम्यान, रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला आहे. दरम्यान, करोना संकटाच्या काळात आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि अत्यावश्यक वस्तूच्या वाटपासाठी काही भागांत दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार नवीनत राणाही त्यांच्यासोबत होत्या. रवी राणा यांच्या वडिलांना करोनाचा संसर्ग कसा झाला, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमरावतीमध्ये तरुणीच्या गुप्तांगातून कोरोना चाचणीसाठीच स्वॅब नमुने घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. ज्यानंतर नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला होता. पीडितेला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा थेट इशाराही त्यांनी दिला होता. अमरावती येथील आरोग्य यंत्रणा ढासळल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी कोविड चाचणी करणाऱ्या व्यक्तींची पार्श्वभूमी पडताळून पाहिली पाहिजे असा आग्रही सूर आळवल्याचं पाहायला मिळालं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”