लोणंद | लोणंद नगरपंचायतीचा गेल्या पाच वर्षात म्हणावा तसा विकास झाला नाही. तुमच्या मनात जी खंत आहे, तीच माझ्या मनात आहे. नगराध्यक्ष आपला नसल्यास विकासकामे होत नाहीत याचा चांगला अनुभव आला. त्यामुळे आता सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी पक्ष लढविणार असून आपण जागरूक राहून काम केल्यास सत्ता राष्ट्रवादीचीच येणार असल्याचा विश्वास आ. मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.
लोणंद येथे कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ते बोलत होते. आ. मकरंद पाटील यांनी स्वतंत्र लढतीचे संकेत दिल्याने काॅंग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनेही लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकला चलो रे भूमिका घेतली आहे. यावेळी खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दयानंद खरात, जिल्हा कोविड समन्वय समितीचे सदस्य डॉ. नितीन सावंत, माजी नगराध्यक्ष सचिन शेळके- पाटील, लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विनोद क्षीरसागर, ॲड. सुभाषराव घाडगे. शिवाजीराव शेळके-पाटील, लक्ष्मणराव शेळके- पाटील किरण पवार, एन. डी. क्षीरसागर, भरतसाहेब शेळके- पाटील, गाणीभाई कच्छी, शफीभाई इनामदार, नंदाताई गायकवाड, राजूभाई इनामदार, अँड. गजेंद्र मुसळे, शंकरराव क्षीरसागर, सुनील शेळके, भिकूदादा कुर्णे कुर्णे, विठ्ठल शेळके, कय्यूम भाई मुल्ला आदी उपस्थित होते.
आ. मकरंद पाटील म्हणाले, केवळ भाषणबाजी, पोपटपंची करून विजय मिळणार नाही. कार्यकर्त्यांनी कायम जागरूक व अलर्ट राहणे गरजेचे आहे. निवडणुकीत पक्षांशी निष्ठा असणऱ्यांचाच विचार केला जाईल. लोणंद नगरपंचायतीसाठी पहिल्यांदा चांगला उमेदवार देणे हे महत्वाचे आहे. विरोधकांना कधी कमजोर समजायचे नाही. नियोजनबध्द काम करून करेक्ट कार्यक्रम करायचा आहे.