नाशिक प्रतिनिधी | किसान सभेच्या वतीने वर्षभरापूर्वी नाशिक ते मुंबई भव्य किसान लाँग मार्च काढण्यात आला होता. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या केलेल्या विश्वासघाता विरोधात पुन्हा एकदा हे लाल वादळ मुंबईत धडकणार असल्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेने जाहीर केला आहे. नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दिनांक २० फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक येथील मुंबई नाका येथून लाँग मार्चला सुरुवात होणार आहे. सात दिवस पायी चालून हा लाँग मार्च २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. मागील लाँग मार्च पेक्षा या लाँग मार्च मध्ये दुप्पट शेतकरी सामील होणार आहेत. राज्यभरातील २३ जिल्ह्यांमधून शेतकरी सहभागी होणार अशी माहिती किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी दिली.
अजूनही अगोदरच्या मागण्यांची अंमलबजावणी नाही
किसान सभेच्या वतीने वर्षभरापूर्वी नाशिक ते मुंबई भव्य पायी लाँग मार्च काढण्यात आला होता. शेतकरी कर्जमुक्ती, दीडपट हमीभाव, कसत असलेल्या जमिनींची मालकी, बुलेट ट्रेनला विरोध, पाणी, शेतकरी पेंशन यासारख्या शेतक-यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या या लाँग मार्चने राज्य सरकारकडे केलेल्या होत्या. लाँग मार्च मध्ये ४० हजार शेतकरी पायी चालत मुंबईला पोहचल्यावर राज्य सरकारने शेतक-यांच्या या मागण्या मान्य केल्या होत्या. नवले म्हणाले, ‘लाँग मार्चला एक वर्ष पूर्ण होत असताना, अद्याप मान्य केलेल्या अनेक मागण्यांची राज्य सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. शेतक-यांमध्ये यामुळे मोठा असंतोष खदखदतो आहे.’
२९ नोव्हेंबरला अखिल भारतीय स्तरावर २०८ शेतकरी संघटनांनी एकत्र येत शेतक-यांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे ऐतिहासिक किसान मार्चचे आयोजन केले होते. शेतक-यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव व शेतीसाठी सर्वंकष पर्यायी शेती धोरण या प्रमुख मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या किसान मार्च मध्ये देशभरातून लाखो शेतकरी सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार किसान मार्चची दखल घेऊन नव्या अर्थसंकल्पात या मागण्यांच्या पूर्ततेसाठी तरतूद करेल अशी आशा होती परंतु तसे काही घडल्याचे चित्र दिसत नाही.
हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी रोजी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कर्जमाफी व दीडपट हमीभावा ऐवजी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ आणून मेटाकुटीला आलेल्या शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा संतापजनक प्रकार असल्याचे सभेच्या ठरावात सांगण्यात आले. अशा पार्श्वभूमीवर किसान सभेच्या वतीने हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. असा निर्णय अखिल भारतीय किसान सभा आयोजित बैठकीमध्ये घेण्यात आला. बैठकीला सभेचे डॉ. अशोक ढवळे, आमदार जे.पी गावित, किसन गुजर, अर्जुन गाडे तसेच डॉ. अजित नवले उपस्थित होते.
प्रमुख मागण्या –
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर समुद्राला वाहून जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी महाराष्ट्राच्या कोरडवाहू विभागात वळविण्यासाठी तातडीने पावले उचला, शेतक-यांना देशव्यापी संपूर्ण कर्जमुक्ती द्या, दुष्काळ निर्मूलन, निवारण, रोजगार व सिंचनासाठी तातडीने उपाय योजना करा, रास्त उत्पादनखर्च पकडून शेतीमालाला दीडपट हमीभाव देणारा कायदा करा, कसत असलेल्या जमिनी कसणारांच्या नावे करा, स्वामिनाथन आयोगाच्या प्रकाशात पर्यायी शेती धोरणाचा स्वीकार करा या प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढला जाणार आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
…तर भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपती वाट्टेल तेवढा वेळ देतील ! – डॉ. कुमार सप्तर्षी
अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू