हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2022 ला अवघा 1 आठवडा राहिला असून लवकरच आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. 2022 मध्ये भारतीय राजकारणात देखील अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. काही राज्यात निवडणुका पार पडल्या, काही ठिकाणी जुनी सरकारे जाऊन नवीन सरकार स्थापन झाले. 2022 लाच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील ऐतिहासिक भारत जोडो यात्रा सुद्धा याच वर्षात सुरु झाली. चला आज आपण जाणून घेऊया 2022 मधील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा…..
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक-
२०२२ या वर्षातील सर्वात मोठी राजकीय घटना म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक. या निवडणुकीत गांधी घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने सहभाग घेतला नव्हता. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात काँग्रेस अध्यक्षपदासाठी लढत झाली. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले. खर्गे यांच्या रूपाने गेल्या 25 वर्षांनंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी निवडून आली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपची बाजी-
यंदा भारतातील वेगवेगळ्या राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामधील उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि गुजरातमध्ये भाजपने बाजी मारली. पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवत राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने आपले पुढचे पाऊल टाकले. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता काबीज केली. सर्व निवडणुकीचे एकूण कल पाहता देशात अजूनही मोदी लाट कायम दिसली, तर काँग्रेसला अजूनही विजयासाठी झुंजावे लागत आहे.
महाराष्ट्रात सत्ताबद्दल, ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं-
या वर्षातील सर्वात मोठी धक्कादायक राजकीय घटना म्हणजे महाराष्ट्रातील सत्तांतर… राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार अवघ्या अडीच वर्षात कोसळले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेतीलच 40 आमदारांनी बंडखोरी करत माविआ सरकार पाडले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे 2 गट पडले. शिंदे गटाने भाजपसोबत सत्तास्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. येव्हडच नव्हे तर खरी शिवसेना कोणाची? ठाकरेंची कि शिंदेंची हा वाद अजूनही कोर्टात सुरु आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा –
2022 मधील ऐतिहासिक घटना म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा… 7 सितंबर 2022 ला कन्याकुमारी पासून सुरु झालेली हि यात्रा काश्मीर पर्यंत जाणार आहे. 150 दिवसांच्या या पदयात्रेत राहुल गांधी तब्बल 3500 किलोमीटर पायी प्रवास करत आहेत. समाजातील विविध घटकांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा ते जाणून घेत आहेत. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला जनतेचा मोठा प्रदिसाद मिळत आहे. या यात्रेच्या रूपाने देशाला एका नव्या राहुल गांधींचे चित्र पाहायला मिळालं.