बॉलिवूड कट्टा | करिअर आणि प्रेमाच्या वाटचालीत स्वतःला नक्की काय हवंय याचा शोध तुम्ही घेत असाल तर भंजाळलेलं डोकं शांत ठेवून तुम्ही लव आज कलचा नुकताच आलेला फ्रेश भाग बघायला हरकत नाही.
१९९० आणि २०२० मध्ये घडत असलेल्या करिअर ओरिएंटेड लव स्टोरीमधला लोचा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. इम्तियाज अलीचा चित्रपट म्हटलं की आत्मपरीक्षण करायला लावणारी, सुरुवातीला कॉम्प्लिकेटेड पण नंतर इझी वाटणारी फिलॉसॉफीकल केमिस्ट्री आलीच. २००९ साली आलेल्या लव आज कल चित्रपटाचं पुढचं व्हर्जिन असंच या चित्रपटाबाबत म्हणावं लागेल.
डिअर जिंदगी या चित्रपटात शाहरुख खान ज्यापद्धतीने आलिया भटला आयुष्यात पुढे जाण्यासाठीचं मार्गदर्शन करत असतो त्याच पद्धतीचा बाज या चित्रपटात रणदीप हुडा (राज) आणि सारा अली खान (जुई)च्या संवादात आहे. एखाद्या मुलीला प्रपोज करणं, तिच्या मनात स्वतःविषयी चांगली फीलिंग तयार करणं आणि मग स्वतःला योग्य वाटलं नाही की अंतर राखून वागणं या जगण्यातून पुढे गेलेला १९९० चा राज (रणदीप हुडा), तशाच पद्धतीच्या गोष्टी जेव्हा २०२० मधील जुई (सारा अली खान) कडून होत असतात तेव्हा काय मार्गदर्शन करतो? हे पाहणं चित्रपटातील खास भाग आहे.
प्रेम आणि करिअर याचा बॅलन्स साधत एकमेकांसोबत असलेल्या अंडरस्टँडिंगने पुढं जाता येतं हा चित्रपटातील बेसिक मेसेज आहे. अर्थात हे करत असताना बुद्धीचा अतिरेकी वापर करुन आपण जसं नाही तसं वागण्याचा आणि बनण्याचा प्रयत्न करायलाच नको हे सांगण्यात चित्रपट यशस्वी ठरतो.
वयाची २२-२३ वर्षं पूर्ण केल्यानंतर तरुणांकडून पालकांच्या असणाऱ्या अपेक्षा, तरुणाईचे करियर आणि प्रेमजीवनातले मूड स्विंग्स, आयुष्याचे निर्णय घेताना येणारा ताण या गोष्टी लव आज कलमध्ये दिग्दर्शकाने अचूक टिपल्या आहेत. चित्रपटातील गाणी चांगली झाली आहेत. चित्रपट काहीसा रटाळ आहे, आपल्या जीवनात त्याचा काहीच संबंध नाही असंही चित्रपट पाहताना काहीवेळ वाटेल पण तरीसुद्धा स्वतःला शोधण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट काही अंशी नक्कीच मदत करेल.
बाकी सगळं मीच सांगून उपयोग नाही..!! तुम्हीही काहीतरी बघायला पाहिजेच की..
चित्रपटाला हॅलो महाराष्ट्र टीमकडून – ७/१० गुण