१ नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे ‘हे’ नियम बदलणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । १ नोव्हेंबरपासून (LPG) एलपीजी सिलेंडर, एसबीआय(SBI), डिजिटल पेमेंटचे नियम बदलणार आहेत. हे सर्व नियम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे आहेत. त्यामुळे नवे नियम जाणून घेणं गरजेचं आहे. एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरी यंत्रणेत १ नोव्हेंबरपासून मोठे बदल होणार आहेत. याशिवाय राज्यातल्या बँकांच्या वेळांमध्येही बदल होणार आहे.

OTPशिवाय सिलेंडरची होम डिलेव्हरी होणार नाही
घरगुती वापराचा सिलेंडर बुक केल्यावर काही दिवसांनंतर एजन्सीचे कर्मचारी तो घरापर्यंत घेऊन येतात, अशी सध्याची पद्धत आहे. मात्र १ नोव्हेंबरपासून यामध्ये महत्वाचा बदल होईल. आता सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असेल. ओटीपीशिवाय सिलेंडरची होम डिलेव्हरी होणार नाही. सिलेंडर ऑनलाईन बुक करताना ग्राहकांना पैसे भरावे लागतील. यानंतर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलेव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागेल. अन्यथा ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.

घरगुती सिलेंडरच्या दरांमध्ये बदल
यासोबतच १ नोव्हेंबरपासून घरगुती सिलेंडरच्या दरांमध्ये बदल होईल. केंद्र सरकारच्या धोरणांनुसार पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतात. त्यानंतर नवे दर महिन्याभरासाठी लागू होतात. यंदा सिलेंडरच्या दरात अधिक बदल होणार नाही, अशी शक्यता आहे. मात्र अधिकची सबसिडी खात्यात येणार का, हा प्रश्न आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती अतिशय कमी झाल्या आहेत. त्यामुळे सबसिडी देण्याची गरज उरलेली नाही.

एसबीआयकडून व्याजदरात कपात
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. एसबीआयनं बचत खात्यांवरील व्याजदर १ नोव्हेंबरपासून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयनं व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करून तो ३.२५ टक्क्यांवर आणला आहे.

डिजिटल पेमेंटवर शुल्क नाही
१ नोव्हेंबरपासून ५० कोटी किंवा त्याहून अधिक रकमेची उलाढाल करणाऱ्या उद्योजक, व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट करणं बंधनकारक असेल. रिझर्व्ह बँकेचा हा नियम पुढील महिन्यापासून लागू होईल. याशिवाय डिजिटल पेमेंटवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

महाराष्ट्रातील बँकांच्या वेळेत बदल
१ नोव्हेंबरपासून राज्यातील बँकांच्या वेळेत बदल होणार आहे. राज्यातील बँका एकाच वेळा उघडतील आणि बंद होतील. सकाळी ९ वाजता बँका उघडतील आणि संध्याकाळी ४ वाजता बंद होतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकांना हा नियम लागू असेल. काही दिवसांपूर्वीच अर्थ मंत्रालयानं याबद्दलच्या सूचना दिल्या होत्या.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment