Thursday, October 6, 2022

Buy now

पुणे- बंगलोर महामार्गावर पहाटे लक्झरी बसची कंटनेरला धडक : एकजण ठार

सातारा | पुणे- बंगलोर महामार्गावर माजगाव फाटा येथे थांबलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या लक्झरी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील राखीव चालक गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नईम अली शेख (वय- 37, रा. मालाड, मुंबई) असे मृताचे नाव आहे. सोमवारी पहाटे माजगाव फाटा (ता.सातारा) येथे हा अपघात घडला होता.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,संतोष रामू कोळेकर (वय- 32, रा. लोहगाव, ता. जत, जि. सांगली) हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर ट्रक घेऊन न्हावाशेवा (मुंबई) येथून इचलकरंजी येथे निघाले होते. सोमवारी पहाटे ते माजगाव फाटा येथे महामार्गालगत थांबले होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या खाजगी लक्झरी बसने त्याला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये लक्झरी बसच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. तर कंटेनरचे लोखंडी दरवाजा निखळून गेला. यावेळी लक्झरी बसच्या केबिनमध्ये असलेला राखीव चालक नईम अली शेख याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

या अपघाताची फिर्याद कंटेनर चालक संतोष रामू कोळेकर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून लक्झरी बस चालक रुपेश बाबासाहेब खाकाळ (वय – 44, रा. अंबरनाथ, कल्याण, जि. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार विजय देसाई करत आहेत.