Tuesday, January 7, 2025

अर्णव गोस्वामीच्या अटकेची उद्धव ठाकरेंना किंमत मोजावी लागेल- प्रवीण दरेकर

अलिबाग  । उद्धव ठाकरे सरकारने अर्णव गोस्वामी यांना अहंकारी भावनेने अटक केली आहे. त्यांच्या या वृत्तीचा देशपातळीवर धिक्कार होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. आम्ही ठाकरे सरकारची ही दडपशाही खपवून घेणार नाही. यापूर्वी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा देशातील जनतेने ती सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे भविष्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. (BJP Leader Pravin Darekar take a dig at Thackeray govt)

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ही बातमी समजल्यानंतर आमदार राहुल नार्वेकर, रवी पाटील, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या हे प्रमुख नेते अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. अन्वय नाईक यांच्या परिवाराला न्याय जरुर मिळाला पाहिजे. पण अर्णव गोस्वामी यांनी राज्य सरकारवर टीका केल्यामुळे सरकार दुखावले गेले होते. त्यामुळे सरकारने सुडाच्या भावनेने कट रचून अर्णव गोस्वामी यांना अटक केली, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

अर्णव गोस्वामी हे केवळ निमित्तमात्र आहे. भाजप हा त्यांच्या बाजूने नव्हे तर प्रसारमाध्यमांच्या बाजूने उभा आहे. उद्या कोणत्याही पत्रकारावर अशाप्रकारे कारवाई झाली तर भाजप पक्ष इतक्याच ठामपणे उभा राहील. त्यामुळे अर्णव गोस्वामी यांच्या निमित्ताने भाजपवर पोटशूळ काढण्याचे काही कारण नाही. राज्य सरकारकडून सोयीचं राजकारण आणि कायदा सोयीने वापरला जातोय. मात्र, भाजप राज्य सरकारला लोकशाहीतीली स्वातंत्र्याचा गळा घोटून देणार नाही, असे प्रवीण दरेकर यांनी ठणकावून सांगितले.

काय आहे प्रकरण ?
अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (84) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.

अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांना नैराश्य आले असावे असा अंदाज आहे. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. रायगड पोलिसांसाठी आता ही हायप्रोफाईल केस झाल्यामुळे त्यांनी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतरच तपासाची पुढील दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष तपास पथक
हाय प्रोफाईल केसमुळे रायगड पोलिसांनी तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी हे तपास पथकाने अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली. तपासणीदरम्यान तपासाची पुढील दिशा निश्चित होण्यास चांगलीच मदत मिळाली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in