सातारा : जिल्ह्यातील माण-खटाव भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसाबाबत आधीच पाच तलाठ्यांचे निलंबन झाले आहे. आता यापाठोपाठ माण तालुक्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन झाल्याने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. वाळू प्रकरणाची ऑडिओ क्लिप आणि विडिओ प्रकरण तहसीलदार यांच्या अंगलट आल्याचे बोलले जात आहे.
वारंवार सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे माण नदीवरील वाळू उपसाबद्दल तक्रारी येत होत्या. मात्र आमच्या भागात कोणतीही बेकायदा वाळू वाहतूक होत नसल्याचे माणच्या महसूल विभागाकडून सांगितले जात होते. या कारवाईने बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांना आणि महसूलविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच धडकी भरली असल्याचे या कारवाईनंतर लोकांमध्ये चाललेल्या चर्चेतुन ऐकण्यास मिळत आहे.
दरम्यान, एका कारवाई वेळचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आली, यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तलाठ्यांचे निलंबन केले होते. आता त्याच प्रकरणात माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचेही निलंबन झाल्याने महसूल विभागासोबत जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.