सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा चांगलाच तडाखा बसला आहे. अतिवृष्टिमुळे जिल्ह्यातील दुर्गम अशा डोंगरमाथ्याकडेला असलेल्या गावातील घरे, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील झांजवड गावासह इतर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी आल्यास विदारक परिस्थिती पहायला मिळत असून शासनाने तत्काळ पुनर्वसन करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील डोंगर भागात असणाऱ्या झांजवड गावास 22 जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे या गाव परिसरातील शेतीच्या जमिनी पाहून गेल्या असून पिकांचेही नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अजूनही महाबळेश्वर तालुक्यातील झांजवडसह, चतुरबेट, दुधगाव, गोरोशी या दुर्गम भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत असून शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत.
अतिवृष्टीमुळे याठिकाणच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून अनेक ठिकाणी रस्ते पूल वाहून गेले आहेत. डोंगरातून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगराळ भागात असणारी अनेक घरे खचल्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांचे राहणे मुश्किल झाले आहे. सध्या या भागातील ग्रामस्थांकडून पुनर्वसन तसेच झालेल्या नुकसानीबाबत शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. झांजवड परिसरतील डोंगर खचल्यामुळे या ठिकाणी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.