अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवसेनेत अथवा भाजपमध्ये जाण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. अशात अहमदनगरचे राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत राहून विधानसभा निवडणूक जिंकता येणार नाही म्हणून संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर आहेत. सध्या ते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड हे अहमदनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र त्यांची उमेदवारी रोखून निवडणूक एकतर्फी करायचा मनसुबा संग्राम जगताप यांनी बांधला आहे. असे झाल्यास अनिल राठोड यांना मोठा शह बसणार आहे. अनिल राठोड हे हाडाचे शिवसैनिक असल्याने शिवसेनेसोबत बंडखोरी करणार नाहीत. याच बाबीचा फायदा घेण्याचा इरादा जगताप यांनी केला आहे.
दरम्यान आपण राष्ट्रवादी सोडणार असल्याचे वृत्त साफ खोटे असल्याचे संग्राम जगताप यांनी म्हणले आहे. राष्ट्रवादी सोडण्याचा आपला कसलाच इरादा नाही माध्यमात झळकणारे वृत्त साफ खोटे आहे असे संग्राम जगताप म्हणाले आहेत. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे तरुण आमदार म्हणून ओळखले जातात. तरुणांना पुढे आणण्याची घोषणा शरद पवार यांनी केली असतानाच राष्ट्रवादीचे तरुण आमदार असे पक्षाला सोडण्याच्या तयारीत असतील तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे.