हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात एटीएसच्या वतीने नुकतीच मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक केली आहे. पुण्यातील हे दहशतवादी कनेक्शन समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, पुण्यात एटीएसने केलेल्या कारवाईत मोहम्मद जुनेद खान (वय 24, रा. दापोडी) या तरुणाला अटक केली असून दहशतवादी कारवाई करणयासाठी त्याला जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पैसे पुरविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जुनेद गेल्या काही महिन्यांपासून समाजमाध्यमातून जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता.
पुण्यातील एटीएसच्या पथकाला जुनेदबाबत माहहती मिळाली होती. त्यानंतर एटीएसच्या पथकाने आज पुण्यातील दापोडीतून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. तो दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वी एका तरुणीही केली होती अटक
एटीएसने काही दिवसापूर्वी पुण्यातून एका तरुणीलाही अटक केली होती. संबंधित तरुणी गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले होते. जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता तसेच फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवादी संघटनांनी बाँबस्फोट घडवून आणले होते.