मुंबई । देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आरोग्य स्थितीची माहिती देऊन काही मागण्या पंतप्रधानांपुढं मांडल्या. उद्धव ठाकरे यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी तसंच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत अशा काही मागण्याही केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांना केल्या या मागण्या:
१)कोरोनावर निश्चित औषध उपलब्ध नसले तरी काही औषधांचा समावेश असलेल्या उपचार पद्धती सकारात्मक परिणाम दाखवत आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मान्यता मिळावी.
२)सध्याच्या स्थितीत परीक्षा होऊ नये असं राज्य सरकारचं मत आहे. अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुण निश्चिती करण्याचा विचार आहे. केंद्राने व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एकसमान निर्णय घ्यावा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना एकच न्याय मिळेल.
३)प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला जुलैपासून पुढील ३ महिने कालावधी वाढवून मिळावा. यामुळे रेशन कार्ड धारकांना लाभ मिळेल.
४)राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा व्हावा यासाठी निर्देश द्यावेत. जेणेकरून पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल.
५)राज्याकडे पीपीई किट्स आणि एन ९५ मास्कची उपलब्धता आहे, मात्र ग्रामीण भागासाठी व्हेंटिलेटर्सची गरज भासणार आहे. त्यामुळं केंद्रानं राज्याला व्हेंटिलेटर्स पुरवावे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”