हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाला 600 कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना मुळे राज्यात १५ एप्रिल पासून दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली. एसटीला केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फक्त ५० टक्के आसन क्षमतेने बसेस चालू ठेवण्याचे बंधन घातलं होतं. त्यामुळे एसटीची वाहतूक मंदावली होती. त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसुलावर झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत तुटपुंजे उत्पन्न कसेबसे एसटी महामंडळाला मिळत होते. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवने देखील एसटीला शक्य नव्हते.
एसटीला आर्थिक मदत मिळावी म्हणून एसटी महामंडळाने शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या बाबतचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर दैनंदिन खर्चासाठी 600 कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे अजित पवार यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.