मुंबई । कोरोना संकटात रुग्णवाहिकांबाबत राज्यभरातून तक्रारी येत होत्या, अर्धा किलोमीटरसाठी ५ ते ८ हजार रुपये आकारले जातात, त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायचा त्याचा निर्णय त्या-त्या जिल्ह्यातील आरटीओकडून घेण्यात येईल. आरटीओकडून ठरवण्यात आलेल्या दरांहून अधिक दर घेतल्यास, परवाना रद्द केला जाईल तसंच याबाबत गुन्हादेखील दाखल केला जाईल. ठरवलेल्या दरापेक्षा अधिक दर लावल्यास लोक जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर तक्रार करु शकतात अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
याशिवाय महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल. कोराना काळात ज्या समस्या येतात त्यावर ही समितीद्वारे देखरेख ठेवली जाईल. कोविड रुग्णालय म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश नाकारला जातो, मात्र यापुढे हा प्रवेश नाकरता येणार नाही. रुग्णालयात एक जागा ठेवण्यात यावी, जिथे रुग्ण आणि नातेवाईकांना बोलता येईल. तसंच आयसीयूमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात कोरोनासाठी एक हेल्पलाईन असावी आणि त्याची अंमलबजावणी या समितीद्वारे करण्यात येईल. कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था करण्यासाठीही ही समिती लक्ष देईल. जिथे लोक बेशिस्तीने वागत असतील, तिथे स्थानिक प्रशासन जनता कर्फ्यू लावत असेल तर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी तसे अधिकार त्यांना दिले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”