कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे हे पूर्ण चुकीचे आहे. महाराष्ट्राची यामुळे फार मोठी हानी झाली आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्र येणार हे नक्की होतं. मात्र दोन महिन्यात असे काय घडलं. तर दोन महिन्यात असे घडले, मोदी साहेबांच्या विचाराचे लोक राज्यात सत्तेत आले आणि त्यांचा ओढा गुजरातकडे आहे, त्यामुळे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप शिंदे- फडणवीस सरकारवर माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. पाटील बोलत होते. पुढे ते म्हणाले, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे तत्कालीन सरकारमध्ये मंत्रिमंडळात होते. वेदांत कंपनीने सर्च रिपोर्टमध्ये महाराष्ट्र राज्याला प्राधान्य दिले होते. मग असे काही घडले की तो प्रकल्प बाहेर गेला. बाहेर राज्यात गेला आणि तो गुजरातलाच का गेला? हा प्रकल्प कर्नाटक तामिळनाडू का केला नाही? असा सवालही आ. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नारायण राणे पूर्वी शिवसेना, काॅंग्रेस आता भाजपात
नारायण राणे यांच्या संदर्भात मी बोलू इच्छित नाही. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले होते. आता त्यांचं असं आहे, पूर्वी ते शिवसेना, काँग्रेस आणि आता ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना जे पूरक असतं तेच ते बोलत असतात. सध्या त्यांचा उद्धव ठाकरे यांच्यावरती राग आहे.