ग्रामपंचायत उमेदवारांना ‘ही’ अट आली आडवी; अनेकांचा पत्ता झाला कट, तर बाकींची अर्ज भरताना होतेय दमछाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । (Gram Panchayat Election) ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलं असली तरी ग्रामपंचायती रिंगणात इच्छुक उमेदवारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 वी पासची टाकण्यात आलेली अट, उमेदवारी अर्ज भरण्यात सलग तीन सुट्ट्यांनी घातलेला खो आणि ऑनलाईन अर्ज भरताना काही ठिकाणी येत असलेल्या तांत्रिक अडचणी यामुळे इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

नव्या जीआरमुळे इच्छुकांचा हिरमोड
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने नाव जीआर जारी केल्याने ग्रामपंचायत सदस्य होण्याच्या अनेकांच्या इच्छांवर पाणी फेरले आहे. जो उमेदवार 1995 नंतर जन्मलेला असेल, आणि ज्याला सरपंच म्हणून नियुक्त करायचं असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे. 24 डिसेंबरला हा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गावात वट असूनही केवळ शिक्षण नसल्याने अनेकांना निवडणूक लढवता येणार नाहीये. परिणामी आपल्या सग्यासोयऱ्यांना, शिकलेल्या बायकोला उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी सेटिंग सुरू केली आहे. (Gram Panchayat Election: Candidates have to face rules and guidelines)

सलग सुट्ट्यांमुळे टेन्शन
निवडणूक आयोगाने इच्छुकांना 23 ते 30 डिसेंबर 2020 दरम्यान अर्ज भरण्यास सांगितले आहे. आयोगाने इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी एकूण 8 दिवस दिले आहेत. मात्र, यातील तीन दिवस तर सुट्ट्यांमध्येच जात असल्याने केवळ पाचच दिवस हातात उरत असल्याने इच्छुकांना टेन्शन आलं आहे. आज नाताळ असल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या 26 डिसेंबर रोजी महिन्याचा शेवटचा शनिवार असल्याने सुट्टी आहे. तर 28 डिसेंबर रोजी रविवार असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे आता इच्छुकांना थेट सोमवारीच अर्ज भरावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अत्यंत कमी वेळ असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करणं, झेरॉक्स करणं, अनामत रकमेची जमावजमव करणं आदी गोष्टींसाठी या इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सुट्टीच्या दिवशीही कामकाज
एकीकडे सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे उमेदवारी अर्ज भरणं इच्छुकांना शक्य नसले तरी अहमदनगरला मात्र सुट्टीच्या दिवशीही जातपडताळणी कार्यालय सुरू राहणार असल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी अर्ज सादर करण्यासाठी कमी कालावधी राहिल्याने सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरू राहणार आहे.

ऑनलाईनचा घोळ
ऑनलाईन अर्ज भरताना राज्यात अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत. तांत्रिक कारणामुळे उमेदवारी अर्ज भरताना वेळ लागत आहे. काही ठिकाणी तर ऑनलाईन घोळामुळे इच्छुकांना दोन दिवसांत एकही अर्ज भरता आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणच्या इच्छुकांचे दोन दिवस वाया गेले आहेत. त्यातच तीन दिवस सलग सुट्टी आल्याने पुढच्या तीन दिवसात अर्ज भरण्याची तारेवरची कसरत या इच्छुकांना करावी लागणार आहे.

सेतू केंद्रांवर गर्दी
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील सेतू केंद्रावर प्रचंड गर्दी झाली आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक एकाच वेळी सेतू केंद्रावर आल्याने ही गर्दी झाली असून त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात हे चित्रं पाहायला मिळत आहे.

राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या अर्जांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होणार असून नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment