मुंबई । कोरोनाची (corona) लक्षणे नसतानाही श्रीमंत लोक आयसीयू बेड्स अडवून ठेवत असल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली. ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत, त्यांना बेड्स दिली पाहिजेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. याशिवाय पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
“अनेकदा रुग्ण स्वत:च आयसीयूत दाखल होण्याचा निर्णय घेतात. दबाव आणून आयसीयू बेड अडवले जात आहेत. छोट्या शहरांमध्येही हे सुरु असून ते चुकीचं आहे. आयसीयू बेड हे आयसीयूच्या रुग्णांनाच मिळाले पाहिजेत. कोणतीही लक्षणं नसणाऱ्यांना ते दिले नाही पाहिजेत. पण दुर्देवाने काही श्रीमंत लोक जे खर्च उचलू शकतात ते आयसीयू बेड अडवतात. त्यामुळे अनेकदा आयसीयू बेड्सची कमतरता जाणवते. याबद्दल जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना जागरुक राहावं लागेल. लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेड देण्यावर प्रतिबंध आणावे लागतील,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रायकर यांचा मृत्यू होणं हे दुर्देवी आहे. पुण्यात बेड्सची आणि रुग्णवाहिकांची कमतरता असणं दुर्देवी असून जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. रुग्णवाहिका न मिळाळ्याने एखाद्या रुग्णाला त्रास होणं हे चुकीचं आहे. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये हा आमचा प्रयत्न असतो. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना रुग्णवाहिका किती घ्याव्यात आणि किती घेऊ नये याबाबत कोणतंही बंधन घातलेलं नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत लागेल तेवढ्या रुग्णवाहिका घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त रुग्णवाहिका घेतल्या तरी काही हरकत नाही. मात्र रुग्णांना मोफत रुग्णवाहिका मिळाली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.