राजेश टोपेंनी लिहलं डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या युद्धात आघाडीवरचा सैनिक जसा जिवाची बाजी लावून लढतो, त्याचप्रमाणे आपले डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून अथक लढत आहेत. अवघा देश आपल्या कुटुंबीयांसोबत घरात असताना हे कर्मचारी कुटुंबापासून, मित्रमंडळींपासून दूर राहून सेवाभाव जपत आहेत. त्यांचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत,’ अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर, नर्स वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा गौरव केला आहे. तसंच, त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

आरोग्य क्षेत्रातील आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून आरोग्यमंत्र्यांनी लिहलेल्या पत्रात म्हटलंय की, कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला आणि तेव्हापासून आपण मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करताय. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार! असं टोपे यांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा शिरकाव सुरू झाल्यापासून आपण सर्वप्रथम त्याला सामोरे गेला आहात. सर्वात आधी तुम्ही मंडळींनी या युद्धाला सामोरे जाण्यासाठी नेतृत्व केलं. त्याचप्रमाणे एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्ध लढता आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता दाखवत आहात. हे अभिनंदनीय आहे. असंही टोपे आपल्या पत्रात म्हणाले.

तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळतेच परंतु आम्हालाही त्यामुळे काम करण्याचं पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे. समस्त देशवासिय आपापल्या घरात कुटुंबियांसमवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर जात, सेवाभाव जपत आहात. खरं तर आपलं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा, असे आवाहनही शेवटी आरोग्यमंत्र्यांनी या पत्रात केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा