मुंबई । कोरोनासाठीचे हॉटस्पॉट, कंटेंटमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून देशात सर्वत्र दुकाने सुरू करण्याची परवानगी एका आदेशान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. तसेच राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार दुकानं सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात असं या आदेशात म्हटलं गेलं होत. त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया देत लॉकडाऊन संपेपर्यंत राज्यात कोणतीही दुकान सुरु करणार नसल्याचं सांगितलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
केंद्राच्या दुकान सुरु करण्याच्या आदेशाबाबत टोपे म्हणाले, “३ मेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत. केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश दिले आहेत. ज्यानुसार काही दुकानांना, व्यवहारांना केंद्र सरकारने संमती दिली आहे. मात्र जोपर्यंत राज्य शासन यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असलेली दुकानं सुरु करण्याचा काही प्रश्नच येत नाही. काल रात्री केंद्राने काही निर्णय घेतले आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही” असं टोपे यांनी म्हटलं आहे.
“लॉकडाउन हा कदाचित ३ मेपर्यंत जसा आहेत तसाच सुरु राहील. त्यात काही बदल होणार नाही. ३ मे नंतरच याबाबतीतला निर्णय होईल. येत्या २७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक आहे. त्यावेळी काही वेगळा निर्णय घेतला गेला तर तो माननीय मुख्यमंत्री सांगतीलच” असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा वगळून सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश जारी करत काही व्यवहारांना सूट दिली. मात्र असा कोणताही राज्य सरकारने घेतलेला नाही असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”