मुंबई | राम मंदिराबाबत उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली, त्याच आम्ही स्वागत करतो. राममंदिरासाठी बोलणाऱ्या प्रत्येकासोबत आम्ही आहोत आणि आमच्यासोबत ते आहेत. असं म्हणत संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, मोदी सरकार आणि संघावर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा बाजूला पडला. आता शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरल्यावर सगळीकडे धावपळ सुरू झाली आणि आता पुन्हा एकदा राम मंदिरारासाठी आंदोलनाची गरज संघाला वाटू लागली आहे. म्हणजे आपलं मजबूत संख्याबळ असलेलं सरकार सत्तेत असताना राम मंदिरासाठी आंदोलनाची गरज वाटत आहे, तर हे सरकार तुम्ही खाली का नाही खेचत, असा खणखणीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
आज शिवसेनेचे आमदार, संपर्क नेते, जिल्हा पदाधिकारी यांची शिवसेना भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. राज्यातील दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता त्या भागात कोणकोणती काम कशा पद्धतीने करावी, दुष्काळग्रस्तांसाठी विविध उपक्रम पक्षाकडून कसे राबवता येतील यावर मार्गदर्शन केलं. तसेच 25 नोव्हेंबर रोजी अयोध्या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांना कार्यक्रम आखून दिल्याचं त्यांनी या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी पत्रकारांनी संघाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेवर आधारित प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले.
‘केंद्रातील सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिश्रमातून सत्तेत आलं आहे, असं म्हणतात. पण सत्तेत आल्यानंतर संघाचे जे कार्यक्रम होते जसे राम मंदिर, कलम ३७० रद्द करणे, समान नागरि कायदा हे सारेच बाजूला पडले. आता शिवसेनेने वारंवार राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आणि आता मी स्वत: 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहे. त्यानंतर साऱ्यांची धडपड सुरू झाली. आता राम मंदिर उभं राहिलं नाही तर पुन्हा आंदोलन उभं करण्याची गरज संघाला वाटते आहे. पण केंद्रात बहुमतात असलेलं सरकार असाताना आंदोलन करावं लागत असेल तर अशा या सरकारला तुम्ही खाली का नाही खेचत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.